← Musical Journey

याद आ रही है ..

by Dr. Manasi Arkadi

गवयाचं पोर सुरात रडतं असं म्हणतात, पण शेखरच्या बाबतीत बोलायचं तर तालवादकाचं हे पोर नुसतच सुरात रडलेलं नाहीये, तर ते सुरात गातय आणि सुरात वादनही करतंय. शेखरचे वडील श्री.पद्माकर महामुनी हे एक उत्तम तबलावादक, बासरीवादक आणि सतारवादक आहेत. त्यामुळे संगीताचं बाळकडू शेखरला घरातच मिळालं. बाजेच्या आणि चिकारीच्या तारेशी खेळत आणि वडिलांनी सतारीवर छेडलेल्या रागांची सरगम ऐकतच शेखर लहानाचा मोठा झाला. हे असे स्वर-संस्कार आणि सुर-संस्कार झाल्यावर शेखरला सुरांची ओढ लागली नसती तरच नवल होते!

सतारीचे आणि तबल्याचे प्राथमिक धडे त्याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गिरविले. शेखर आता जरी गायक म्हणून नावारुपाला आला असला तरी त्याची सुरांशी गट्टी जमली ती सतार या वाद्यामुळेच आणि म्हणूनच असेल कदाचित त्याचा पहिला सोलो परफॉरमन्स हा सतार वादनाचाच होता आणि ज्या रागाची निवड त्याने केली होती तो होता अत्यंत मधुर असा राग - राग यमन कल्याण. तेव्हा तो केवळ पाचवीत होता आणि निमित्त होते त्याच्या अहमदनगर मधल्या समर्थ विद्यामंदिर या शाळेचे वार्षिक स्नेह-संमेलन आणि त्याला तबल्याची साथ करायला होते साक्षात त्याचे वडील!

वडिलांचा सतार आणि तबला वादनाचा वारसा तर शेखरने जोपासलाच, परंतु घरात गाता गळा कोणाचाही नसतांना त्याही कलेत तो पारंगत झाला. त्याची बोटं जरी सतारीवर सहज फिरत होती तरी मन मात्र गाण्याकडेच धाव घेत होते. कुठलीही सुरावट ऐकली की ती पटकन आत्मसात करून तो त्यावर लीलया गात असे. त्याने आपल्या ‘या’ कलेचा पहिला जाहीर कार्यक्रम नववीत असतांना केला. गाणे होते ‘लव स्टोरी’या चित्रपटातील 'याद आ रही है.' या गाण्याने शेखरला स्वतंत्र अशी एक ओळख दिली. त्यानंतर तो शाळेत कुठेही दिसला की मुलं त्याला बघून 'याद आ रही है' म्हणू लागली आणि हीच त्याच्या यशाची पहिली पावती होती.

शेखरचा हा गुण त्याच्या मामाने हेरला आणि त्याच्या दहावीच्या सुट्टीत ‘त्रिमिती कला मंच’ या संस्थेत त्याला कोरससाठी नेले. तो शो होता 'महाराष्ट्राची लोकधारा' आणि हीच त्याच्या पुढील वाटचालीची नांदी ठरली!