← Musical Journey

ऋणानुबंधाच्या ...

by Dr. Manasi Arkadi

(12)

तसं बघायला गेलं तर पंख जसे गरुडाला आहेत तसे इतर पक्षांना देखील आहेतच की, पण मग तरीही आपण 'गरुडझेप' असाच शब्दप्रयोग का करतो? कबुतरझेप किंवा कावळाझेप का नाही? वाचायला पण विचित्र वाटतं ना, पण खरंच काय असावं याचं कारण? गरुडाच्या रक्तात भिनलेली आकाशाविषयीची आसक्ती की गगनभरारीच्या ध्यासाने पंखांना मिळालेले बळ? कदाचित या सगळ्याचाच तो एकत्रित परिणाम असावा आणि म्हणूनच गरुडाने घेतलेली ती 'झेप' असते आणि इतर पक्षांचे नुसतेच 'उडणे.' शेखरबद्दल लिहितांना याचा प्रत्यय पदोपदी येतो. गाता गळा लाभलेले कमी आहेत का, पण हे असं झपाटून जाणं, शब्द-स्वरांनी नादावून जाणं, सुरांच्या दुनियेत हरवून जाणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. हे ज्यांना जमलं त्यांनीच रसिकांच्या मनावर राज्य केलं, बाकी सगळे 'also sang' याच गटातले.

शो, मग तो कुठलाही असो, शेखरने त्यासाठी घेतलेली मेहनत ही वाखाणण्याजोगीच असते, पण जर तोच शो खास महत्व घेऊन येत असेल तर शेखरच्या उत्साहाला उधाण आलेले असते. स्वरालीच्या शंभराव्या शो साठी शेखर असाच झपाटून कामाला लागला. त्याच्या लाडक्या संगीतकार जोडी समोर म्हणजेच अनिल-अरुण यांच्यासमोर त्यांच्याच गाण्यांचा कार्यक्रम करायचा असा त्याचा मानस होता, पण अरुण पौडवाल यांच्या अकाली निधनाने शेखरचे हे स्वप्न अपुरे राहिले. पण तरीही त्यांच्याच गाण्यांनी 'शतकमोहोत्सवी' मैफिल सजवायची हे त्याने मनोमन ठरविले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून त्याने एका अशा गायिकेला निमंत्रित केले ज्यांना गोड गळया सोबत गोड चेहऱ्याचेही वरदान लाभले होते, ज्यांनी मंगेशकर भगिनींच्या एकाधीकाराला समर्थपणे टक्कर देत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते आणि ज्या त्यांच्या काळातल्या बहुधा एकमेव अशा गायिका असतील ज्यांना नायिकेच्या बरोबरीने कॅसेटच्या मुखपृष्ठावर झळकण्याचे भाग्य लाभले होते - जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल. गम्मत जम्मत, अशी ही बनवाबनवी, नवरी मिळे नवरयाला, एका पेक्षा एक अशा चित्रपटांमधला त्यांचा मिश्किल, खट्याळ, अवखळ, अल्लड आवाज; तेजाब, साजन, आशिकी, लाल दुपट्टा मलमल का मध्ये वयात येतो, दिलखेचक होतो, घायाळ देखील करतो आणि मग तोच आवाज टी-सिरीज साठी भजने गातांना सोज्वळ, नितळ, सात्विक, देवघरात शांत तेवणाऱ्या समई सारखा वाटतो. अनुराधाताईंच्या आवाजाची जादू ही अशी आहे!

शेखरने या 'विशेष कार्यक्रमाची' बांधणी पण विशेषच केली होती. पूर्वार्धात अनिल-अरुण यांची गाणी, अष्टविनायक चित्रपटातील गाण्याचे नृत्यासह सादरीकरण आणि उत्तरार्धात अनुराधाताईंची मुलाखत. ३१ मार्च १९९७ मध्ये बालगंधर्व रंगमंदिरात झालेला हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. अनुराधाताई कमालीच्या प्रभावित झाल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी शेखरला फोन केला आणि २ एप्रिलला गडहिंग्लजयेथे होणाऱ्या आपल्या कार्यक्रमासाठी सहगायक म्हणून त्याला आमंत्रित केले. तो अनुभव शेखरसाठी विलक्षण होता. याच निमित्ताने सुदेश भोसले, जॉली मुखर्जी, मोहम्मद अझीझ , सुरेश वाडकर यांच्यासारख्या अनेक गायकांबरोबर गायची शेखरला संधी मिळाली आणि एक फार मोठं दालन त्याच्यासाठी खुलं झालं!

'किती लकी आहे ना शेखर!' अशी प्रतिक्रिया बहुतेकांची झाली असेल हे वाचून. पण नशीब हा असा प्रकार आहे जो संधी दारापर्यंत आणून ठेवतो, पण दार उघडण्याचे कष्ट ज्याला त्यालाच करावे लागतात. ओळख नसतांना प्रमुख पाहुण्या म्हणून येण्याचे अनुराधाताईंनी मान्य केले हे शेखरचे नशीब, पण अनुराधाताईंनी त्याची सहगायक म्हणून निवड केली हे त्याचे स्वतःचे कर्तृत्व! अनुराधाताईंनी खरंतर तो पर्यंत शेकडो नवोदित, होतकरू गायकांना ऐकले असेल, पण शेखरच्या आवाजातील वेगळेपण, त्याची जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची वृत्ती, सर्वोत्तम देण्याचा ध्यास त्यांच्यातल्या अनुभवी कलाकाराने हेरला आणि सुरु झाला त्या दोघांचा आज पर्यंतचा २३ वर्षांचा गानप्रवास!

काही ऋणानुबंध हे 'शब्दांच्या पलीकडले' असतात. त्या शुभंकर गाठी वर कुठेतरी आधीच बांधलेल्या असतात, फक्त ती वेळ यावी लागते, तो योग जुळून यावा लागतो. तानपुऱ्याच्या तारा जुळून याव्यात आणि नादमधुर स्वर संवाद झंकारावा असेच काहीसे शेखर आणि अनुराधाताईंचे नाते आहे. सुरवातीला व्यावसायिक पातळीवर सुरु झालेली ही विलंबित ‘आलापी' थेट 'माझ्या धाकट्या भावासारखा आहे तो' असं अनुराधाताईंनी घेतलेल्या 'ताने' पर्यंत कधी गेली हे त्या दोघांनाही कळले नाही. म्हणूनच असेल कदाचित रेडीओ मिरची वर 'अरुणजी' स्पेशल शो करायचा असून त्यासाठी अरुणजींची संपूर्ण माहिती हवी आहे असे जेव्हा आर. जे. स्मिताने अनुराधाताईंकडे बोलून दाखविले, तेव्हा त्यांनी 'पौडवाल कुटुंबाची सगळ्यात जवळची व्यक्ती' म्हणून शेखरचे नाव तिला सुचविले. हा विश्वास त्यांनी दाखविला म्हणून त्यांचे जेवढे कौतुक वाटते तेवढेच या विश्वासाला पात्र ठरल्याबद्दल शेखरचे देखील! शेखर, तुझ्या सांगितिक जीवनाची ही रजनीगंधा अशीच बहरत राहो!