← Musical Journey

गड्या आपुला गाव बरा ...

by Dr. Manasi Arkadi

(19)

दिल ने हमसे जो कहा, हमने वैसा हि किया

फिर कभी फुरसत से सोचेंगे, बुरा था या भलाI

शैलेंद्रच्या या ओळी किती सहज गुणगुणतो ना आपण! पण तसं बघायला गेलं तर आपला याच्याशी काडीमात्र संबंध नाही कारण आजकाल आपण इतके धोरणी झालेले आहोत की आपल्याच मनाचा आवाज आपल्याच कानापर्यंत पोहोचत नाही. बिचारं मन काहीतरी सांगायला जातं, पण आपली व्यवहारचतुर बुद्धी त्यात हस्तक्षेप करते, आपल्या फायद्याचं काय आहे याची गणितं मांडते आणि मग भावनिक घासाघीस करून आपण मनाशी चक्क सौदा करून मोकळे होतो! पण कधी कधी वाटतं आपला संबंध नाहीये तेच बरय, कारण ही 'दिल का कहा' भानगड वाटते तितकी सोपी नाहीये. खूप 'जिगर' लागतं 'असं' बरहुकूम वागायला, खासकरून हा आवाज जेव्हा यशाच्या शिखरावर असतांना आपल्याला माघारी फिरायला सांगतो, सुख पायाशी लोळण घेत असतांना त्याला लाथाडायचा सल्ला देतो, किंवा 'किती घेशील दो कराने' असं पैसा/प्रसिद्धी विचारत असतांना हात जोडून तिचा निरोप घ्यायला लावतो….शेखरने मात्र ही हिम्मत दाखवली!

'बोल साँई बोल'च्या निर्मितीदरम्यान 'निषाद ऑडीओ-विज्युल्स' कडे एक भन्नाट ऑफर आली…'चेकमेट' चित्रपटाच्या प्रोडक्शनची! या चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाले होते, पण त्याचा निर्माता आर्थिक अडचणीत सापडल्याने हात वर करून मोकळा झाला होता. आता या कामासाठी शेखर-अनिलला विचारण्यात आले. संजय जाधव दिग्दर्शित हा रहस्यपट टिपिकल 'हॉलीवूड' मूवी वाटावा असा होता. कोण कुणाला चेकमेट देण्यासाठी कुणाचं प्यादं म्हणून वापर करतय हे शेवटपर्यंत कळू न देणारा आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट खरया अर्थाने सस्पेन्स थ्रिलर होता. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, संजय नार्वेकर, सोनाली खरे यासारखी तगडी स्टारकास्ट आणि मराठी चित्रपटांमधून यापूर्वी कधीही न हाताळला गेलेला विषय यामुळे शेखर ही जोखीम घ्यायला लगेच तयार झाला. शेखर-अनिलने चित्रपटाचे हक्क विकत घेतले खरे, पण शेखर हे पुरेपूर जाणून होता की हा तद्दन गल्लाभरू मसाला चित्रपट नाही. यातले प्लॉट्स आणि प्लॅन्स पचनी पडतील असाच प्रेक्षकवर्ग याला लाभणार आहे आणि मग अशा परिस्थितीत हा चित्रपट सरसकट सगळीकडे प्रदर्शित करून चालणार नाही आणि प्रमोशनसाठी वाजवी पेक्षा जास्त पैसा खर्च करणे देखील शहाणपणाचे ठरणार नाही. पण अनिलला भव्य -दिव्यतेची भारी हौस! अनिलने त्या चित्रपटाच्या ५० प्रिंट्स काढल्या,महाराष्ट्रभर जागोजागी मोठमोठे होर्डिंग्स उभे केले, प्रमोशन साठी सुप्रसिध्द संगीतकार जोडी 'अजय-अतुल' यांच्याकडून एक खास गाणे तयार करून घेतले, सर्व प्रमुख वर्तमानपत्रात पानभर जाहिरात दिली, जंगी पार्टी आयोजित केली आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी त्या प्रिंट्सची वाजत - गाजत भव्य मिरवणूक देखील काढली! चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा जास्त खर्च अनिलने त्याच्या 'प्रमोशन' साठी केला. आजवर कोणत्याही चित्रपटाची प्रसिद्धी अशाप्रकारे झाली नव्हती.

८ फेब्रुवारी २००८ रोजी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात ८५ थिएटर मध्ये 'चेकमेट' रिलीज झाला. स्क्रीनवर मोठ्या दिमाखात नाव झळकले - निर्माते कांचन (सौ. अनिल) सातपुते आणि चंद्रशेखर महामुनी! शेखरच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला. चित्रपट पुण्यात ' सिल्व्हर जुबिली ' हिट झाला. मुंबई आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील चांगला चालला. झी गौरव, राज्य शासन चित्रपट महोत्सव, चित्रमहर्षी व्ही. शांताराम पुरस्कार, मटा सन्मान अशी एकंदर १८ पारितोषिकंही या चित्रपटाला मिळाली. अनिल आणि शेखरवर कौतुकाचा वर्षाव झाला आणि …त्यानंतर त्या दोघांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण…हा असा सुखांत अपेक्षित होता का? पण घडलं काहीतरी वेगळच!

खरंतर, शेखरच्या जागी दुसरा एखादा असता तर एवढ्या मोठमोठ्या लोकांमधली उठबस, पार्ट्या, ग्लॅमरच्या दुनियेची चमकधमक बघून हरकला असता, तिथेच रमला असता, पण शेखरचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्याला सतत जाब विचारत होतं, 'हे फिल्ड तुझं नाही, तु यासाठी इथे आलेला नव्हतास, मग हा कुठवर वेड्या घेसी आसरा?' शेखर विचारमग्न झाला होता. 'शौक-ए-जिंदगी'चं पारडं 'सुकून-ए-जिंदगी' पेक्षा जड होत चाललंय हे वास्तव त्याला चटका द्यायला लागलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर हसू होते पण प्रसन्नता नाही, डोळ्यात कर्तव्यपूर्तीची झाक होती पण चमक नाही, कामात चपळाई होती पण उत्साह नाही, मिळालेल्या यशाने मन आनंदी होते पण समाधानी नाही. ही अस्वस्थता लपवून शेखर बदलेल्या परिस्थितीशी मिळतं-जुळतं घेऊ पाहत होता, पण मनाला उभारी मिळेल असे काहीच घडत नव्हते. चित्रपट चालला, पण गुंतवलेली सगळी रक्कम वसूल झाली नाही. एकीकडे हे नुकसान तर दुसरीकडे ऑडीओ कॅसेटचं मार्केट घसरून, व्हिडीओ कॅसेट्सचा जमाना आला होता. 'निषाद ऑडीओ-विज्युल्स' ची दिशा बदलली होती. अनिल चित्रपटाच्या दुनियेत रमायला लागला आणि लगेच पुढच्या चित्रपटनिर्मिती मधे गुंतला. शेखरला पगार मिळत होता, पण त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. स्टुडीओ मधलं संगीत निर्मितीचं काम थांबलं होत या सगळ्या व्यापात आपलं गाण्याकडे दुर्लक्ष होतंय ही सल आगीत तेल ओतायचं काम करीतच होती. ही घुसमट, हा कोंडमारा शेवटी असह्य झाला आणि त्याच्या मनाने परत एकदा उचल खाल्ली… 'तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडूनी या सरिता सागरा'!. मग काय… 'निर्माता' या खुर्चीला, त्यामुळे मिळणाऱ्या मानमरातबाला, मागे-पुढे झुलणारया लोकांना पाठ फिरवून, आपला बाड-बिस्तरा उचलून, 'गड्या आपुला गाव बरा' म्हणत, स्वेच्छेने राजीनामा देत शेखरने 'निषाद ऑडीओ-विज्युल्स' नावाचा सोन्याचा पिंजरा कायमचा सोडला!