सहकारी कलाकार - १
by Dr. Manasi Arkadi
(23)
'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असे म्हणतात. म्हणजे, माणसाने एखादी गोष्ट करायचीच असं ठरवलं तर तो काहीही साध्य करू शकतो, फक्त त्यासाठी एक प्रखर तळमळ लागते आणि ती जेव्हा जन्म घेते, तेव्हा कातळ देखील फोडण्याचे सामर्थ्य देते!
अवघ्या एकोणिसाव्या वर्षी असच एक वेड डोक्यात घेऊन शेखरने 'निषाद'ची स्थापना केली! हे केवळ हौसेखातर आपण करीत आहोत की हीच आपली कारकीर्द आहे हा विचार करण्याची परिपक्वता देखील आलेली नसतांना घेतलेली ही गरुडझेप! 'निषाद'ची मुहूर्तमेढ रोवातांना त्याच्या सोबत त्याच्यासारखी काही ध्येयवेडी मंडळी होती, पैसा/अनुभव काहीही गाठीशी नसलेली, पण एकाच ध्यासाने झपाटलेली, जितेंद्र कुलकर्णी, अमर ओक, केदार मोरे, गिरीश महामुनी आणि उमेश चावक. काही चाणाक्ष वाचकांना या बड्या मंडळींचा मी असा केलेला उल्लेख कदाचित खटकला असेल, पण मी जाणूनबुजून या कलाकारांच्या नावाआधी सुप्रसिद्ध, लोकप्रिय, विख्यात अशी उपसर्गे जोडली नाहीत, कारण आज जरी हे सगळे त्यांच्या क्षेत्रात अत्युकृष्ट कामगिरी करीत असले तरी, तीस वर्षापूर्वी हे सगळेच नवशिके होते, सगळ्यांचीच ती सुरवात होती!
अनुभवी लोकांचा आग्रह सर्वांनीच धरला, तर मग फ्रेशर्सनी जायचं कुठे आणि अनुभव मिळवायचा तरी कसा हा प्रश्न त्याकाळी, कलाकारांच्याबाबतीत तरी, 'निषाद'ने सोडविला होता. धडपड्या, होतकरू, हरहुन्नरी, 'कुछ कर दिखाना है' अशी जिद्द असणारयांसाठी 'निषाद' हे आश्रयस्थान होते. निषादच्या छत्रछायेखाली आलेल्या सगळ्यांनाच सोबतीला घेऊन शेखरने दमदार सुरवात केली. गायन विभाग सांभाळायला शेखर स्वतः तर होताच, पण त्याच्या बरोबरीने होते दयानंद घोटकर. त्या दोघांना साथ देणाऱ्या गायिका होत्या मेधा परांजपे, मेधा चांदवडकर, गीतांजली जेधे, कल्याणी शेळके, भाग्यश्री भंडारे, मंजुश्री मूर्ती, जयश्री कुलकर्णी, सोनाली चित्राव, अश्विनी कुर्पे आणि राधिका अत्रे. निवेदनाची धुरा सांभाळली होती अभय गोखले आणि त्यानंतर डॉ. अमित त्रिभुवन यांनी. ओर्केस्ट्रेशन विभाग देखील चतुरस्त्र कलाकारांनी खचाखच भरलेला होता; सिंथेसायझर/अरेंजर जितेंद्र कुलकर्णी, संगीत संयोजक विवेक परांजपे, मंदार देव, सुभाष देशपांडे , निखील महामुनी , बेस गिटार वादक विजय मूर्ती, लीड गिटार राजूनिरगुडे वविशाल थेलकर , तालवाद्यांवर प्रभुत्व असलेले केदार मोरे आणि नितीन शिंदे, सॅक्सोफोन वादक महेंद्र कांबळे, तबला वादक गिरीश महामुनी, मादल - डूग्गी उमेश चावक आणि पाश्चिमात्य वाद्यांची उत्तम साथसंगत करणारा अभिजित भदे! अभिनय आणि विनोदी बतावणीचा बालेकिल्ला लढवायला होते प्रसाद ओक, सिद्धेश्वर झाडबुके आणि त्यानंतर जमील शेख. तर 'लोकधारा' सारख्या शो ची नजाकत वाढवायला होती लावणी नृत्यांगना स्वप्ना संगमनेरकर! पडद्यामागचे कलाकार सुद्धा काही कमी नव्हते! कार्यक्रमाच्या यशासाठी धडपडणारा अनिल सातपुते, डान्सर्सची सोय करून देणारा प्रवीण सूर्यवंशी आणि नितीन मोरे, साउंड इंजिनीअर्स सुनील कुर्पे, संजय बेंद्रे, प्रोजेक्शन साठी प्रसाद कुलकर्णी ध्वनीसंयोजक जी. मल्लेश , आर्टवर्क डिझाईन साठी शेखर डेरे तर व्यवस्थापन बघणारे प्रदीपकुमार कांबळे आणि मोहन कुलकर्णी! या सगळ्यांना निषादने एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला, अनुभवाने समृद्ध केलं आणि आत्मविश्वास वाढवून परिपूर्ण केलं. या काळात, यांच्यात मैत्रीचे भावबंध जुळले नसते तरच नवल होते. पण, याचा गैरफायदा शेखरने कधीही घेतला नाही. व्यवहाराच्याबाबतीत तो अतिशय चोख राहिला. वेळेवर मानधन, प्रत्येकाच्या सोयीनुसार रिहर्सल्स आणि त्यांच्यातल्या कलाकाराला आदराची वागणूक ही तत्व त्याने कायम पाळली.
आता, पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे. 'निषाद' ही एक उदयोन्मुख संस्था आहे असं म्हणता म्हणता, नावाजलेल्या आणि प्रस्थापित संस्थांच्या यादीत ती गणली जाऊ लागली आहे. कित्येक लोक इथे आले; त्यातले काही पातेल्याला लागलेल्या खरवडीसारखे त्याच्याबरोबरच राहिले, पण काही मात्र 'निर्लेप'च्या भांड्यांसारखे काम झाल्यावर काहीच न चिकटू देता निघून गेले! शेखर मात्र 'हाक मारताच आजही धावून येणाऱ्यांच्या' कौतुकातच रमतो. त्याच्याकडून हे ऐकतांना, एक प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही… आकाशाशी स्पर्धा करतांना, मुळांना घट्ट रोवून ठेवणाऱ्या मातीची इतका सहज विसर पडावा? पण, शेखरच्या मनात मात्र असले विचार येत नाहीत. तो खूप अलिप्तपणे या सगळ्याकडे बघतो. जे मिळालं आहे त्यातच धन्यता मानतो आणि प्रांजळपणे कबुल करतो '"मै तो अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया!"
(क्रमशः)
