← Musical Journey

ऐ वतन तेरे लिये ...

by Dr. Manasi Arkadi

(16)

वो जिस्म भी क्या जिस्म है जिसमे न हो खून-ए-जुनून

क्या लडे तुफ़ान से जो कश्ती-ए-साहिल में है

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में हैI

अशी गाणी ऐकतांना काय स्फुरण चढतं ना! असं वाटतं आत्ता निघावं आणि दहशतवाद्यांना सडेतोड जवाब द्यावा. काय समजतात काय ते स्वतःला? कुणीही सोम्या गोम्याने उठावं आणि आमच्यावर हल्ला करावा? 'ये देश है वीर जवानोंका' हे एकदा दाखवूनच द्यावं यांना. अरे, 'भारत हमको जान से प्यारा है' आणि आम्ही भारतीय 'सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नही!'…. देशप्रेम काय उफाळून येतं ना आपलं, पण…तेवढ्यापुरतच कारण लगेच मनात मुलांचा विचार येतो, आपण आपला जीव धोक्यात घातला तर त्यांचं काय होईल? आईची/बायकोची आठवण होते, आपल्याला ऑफिस मधून यायला थोडासा उशीर झाला तरी दरवाज्यामागे पेला पालथा घालते ती, पण मग 'हम सरहदोंके वास्ते लोहे की एक दिवार है, हम दुश्मनोंके वास्ते होशियार है, तैयार है' अशी ललकारी देणाऱ्या आपल्या जवानांचं काय? आपले वडील आपल्याला परत दिसतील की नाही हीच ज्यांच्या मुलांना खात्री नाही आणि आपण आपल्या बायका-मुलांना परत भेटू शकू की नाही ही जिथे शाश्वती नाही त्यांचं काय?….देशभक्तीपर गाणी ऐकली की हे असच होतं दरवेळी. भावनांचं लोलक असच या टोकापासून त्या टोकापर्यंत झोके घ्यायला लागतं.

ही भावनिक सुनामी निव्वळ आवाजाच्या जोरावर निर्माण करणं हे कौशल्याचं काम आहे. शेखरला सिम्बायोसिस कॉलेज जवळच्या मुनोत सभागृहात साने गुरुजी मंडळातर्फे या गाण्यांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव आला. योगेश बाचल या त्याच्या मित्राने हा प्रस्ताव त्याच्याकडे आणला. योगेश हा त्या मंडळाचा अध्यक्ष होता. आलेला प्रत्येक नवीन प्रस्ताव एक आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या शेखरने आपल्या भात्यात हा नवीन बाण खोचायचा निर्णय घेतला. एक कलाकार या नात्याने शेखर म्हणतो की हे असे शो खूप आव्हानात्मक असतात, गायकीला पैलू पाडणारे असतात, अशा नवनवीन प्रयोगांनी क्षितीज रुंदावत जातं आणि या निमित्ताने आयोजकांना देण्यासाठी बरेच पर्याय देखील उपलब्ध होतात. 'गाता रहे मेरा दिल' पासून हिंदीच्या दुनियेत प्रवेश करणाऱ्या शेखरने 'सात रंग के सपने' हा हिंदी मेलोडीयस गीतांचा शो इंट्रोड्यूस केला होताच आणि आता हा परत एक नवीन विषय… वीररसाने ओतप्रोत भरलेल्या देशभक्तीपर गीतांचा! या गीतांची ताकद तो जाणून होता आणि म्हणूनच ते तितक्याच प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने larger than life चित्र उभं केलं… भव्य वाद्यवृंद, डान्स ग्रुप्स आणि जोडीला त्याचा स्वतःचा 'भावनांना हात घालणारा तडफदार' आवाज! 'ऐ वतन तेरे लिए' अशा समर्पक नावाने हा शो १५ ऑगस्ट २००२ ला रंगमंचावर आला. पुर्वार्धाची सुरवातच त्याने देवगिरीचे साम्राज्य उध्वस झालेल्या काळापासून केली. त्या वेळच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन असणारे 'अखेरचा हा तुला दंडवत' हे सुरवातीचे गीत होते आणि त्यानंतर 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, शूर आम्ही सरदार आम्हाला, गर्जा महाराष्ट्र माझा , जयोस्तुते, म्यानातून उसळे, मराठी पाऊल पडते पुढे, जिंकू किंवा मरु, उषःकाल होता होता' अशी एकापेक्षा एक 'गायकाच्या दमसासाची परीक्षा' बघणारी गाणी त्याने सादर केली. उतरार्धातल्या हिंदी गीतांनी श्रोत्यांच्या मनातील देशभक्तीने परम 'सीमा' गाठली… है प्रीत जहा कि रीत सदा, अपनी आजादी को हम, मेरे देश की धरती, जहा डाल डाल पे, कर चले हम फिदा, संदेसे आते है पासून थेट it happens only in India पर्यंत! आता हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीला जाऊन पोहोचला होता. होतं काय की अगदी पहिल्या गाण्यापासूनच शेखर रसिकांच्या मनाची पकड घ्यायला सुरवात करतो. वातावरणातलं भारलेपण जसजसं वाढत जातं, तसतसं शेखर मधला माणूस त्याच्यातल्या व्यवसायिक गायकावर हावी होतो. आपण केवळ एक माध्यम आहोत हेच तो विसरून जातो आणि तो स्वतः ते सगळ फील करायला लागतो, त्यात गुंतत जातो. त्याच्याही धमन्यातून देशाभिमान उसळ्या मारायला लागतं आणि मग ती वीरश्री, ती समर्पण भावना ओसंडून वहाते, समोरच्या श्रोतृवर्गावर आघात करते आणि त्यांच्यात झिरपत जाते. हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे. पुढची सलग तीन वर्ष या मंडळाने १५ ऑगस्टला याच कार्यक्रमासाठी शेखरला आमंत्रित केले. एखाद्या गायकाला यापेक्षा दुसरी पावती ती कोणती!

लताबाईंनी गायलेलं 'ए मेरे वतन के लोगो' ऐकून पंडित नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं असं म्हणतात. शेखर, हे सामर्थ्य तुझ्या आवाजात देखील आहे. पण, हे देशप्रेमाचे vaccine तू आम्हाला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देऊन पुरेसं नाहीये रे, अधून मधून आम्हाला बुस्टर डोसेसची गरज भासणार आहे. म्हणूनच तू हे शो वरचेवर कर. 'मी आणि माझं घर' या आमच्या संकुचित दृष्टीकोनाला 'माझा देश' म्हणण्याइतपत व्यापक कर, सकाळच्या वाफाळलेल्या चहा बरोबर पेपर मधल्या अत्याचारी बातम्या निमुटपणे गीळणाऱ्या आमच्या कोडग्या मनाला परत एकदा पेटवून उठव, 'माझ्या एकट्याने काय होणार आहे रे' अशा आमच्या पळपुट्या विचारांना दूर सार, शिवाजीराजे/स्वातंत्र्यवीर सावरकर/सुभाषचंद्र बोस यांचे आम्ही वंशज आहोत याची आम्हाला आठवण करून दे, भगतसिंग/राजगुरू परग्रहावरून आलेले नव्हते तर ते आमचेच बांधव होते याची आम्हाला जाणीव करून दे, आमच्यातला देशाभिमानाचा अंगार फुलवत ठेव आणि आमच्या मनावर हे वेळोवेळी बिंबवत रहा कि ….

'ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, तुझे है पुकारा

ये वो बंधन है जो कभी टूट नाही सकता'!

वंदे मातरम!