निषाद ऑडिओ - व्हिज्युअल्स ची स्थापना .
by Dr. Manasi Arkadi
(17)
'हाथों की चंद लकीरों का, सब खेल है बस तकदिरों का' -मान्य आहे, 'वही होता है जो मंजुर-ए-खुदा होता है' हे सुद्धा कबूल, पण तरीही भविष्याची स्वप्न रंगवणं आपण सोडतो का? 'जो भी होगा देखा जायेगा' हा त्यावर तोडगा काढत स्वप्न रंगविणे मागील पानावरून पुढे चालू! पण कधी कधी हे मनातले मांडे मनातच राहातात कारण नियतीने समोर काहीतरी वेगळेच वाढून ठेवलेले असते. तिच्यापुढे कुणाचंही काही चालत नाही. अगदी 'मी असो, तू असो, हा असो, कुणी असो, दैवलेख ना कधी कुणा टळला.' शेखरच्या बाबतीतही काही वेगळं घडलेलं नाही! खरंतर, 'निषाद' सारखी स्वतःची संस्था नावारूपाला आली होती, मराठी वाद्यवृंदाच्या विश्वात स्वतःला त्याने सिद्ध केलं होतं, हिंदी मधे धुमधडाक्यात प्रवेशही केला होता… सगळं कसं योजनाबद्ध आणि सुरळीत चाललं होतं. पण शेखरचा महत्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. 'व्हॉट नेक्स्ट' हा प्रश्न त्याला सारखा सतावत होता. आतापर्यंत गाठलेला टप्पा त्याच्यासाठी केवळ एक स्टेशन होतं, डेस्टीनेशन नाही. आणि मग प्रत्येक स्वप्नाळू डोळ्यांना जशी मायानगरी मुंबई खुणावते, तशीच ती शेखरलाही खुणावू लागली. मनात विचार यायचा अवकाश, लगेच तो अमलात आणण्याच्या तयारीला शेखर लागला!
पण 'देवाजीच्या मनात' काहीतरी वेगळेच होते! अनिल सातपुते या मित्राजवळ शेखरने आपला हा निर्णय सहज बोलून दाखविला. अनिलबद्दल सांगायचे तर तो आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात कमालीचा व्यस्त होता, पण संगीतावर त्याचे निरातिशय प्रेम होते. शेखरचा एकही शो तो चुकवित नसे. सुरवातीला केवळ एक चाहता असलेला अनिल थोड्याच दिवसात शेखरचा घनिष्ट मित्र झाला होता. संगीतक्षेत्रात काहीतरी करण्याची त्याची स्वतःची ईच्छा होतीच, तेव्हा शेखरला मुंबईला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याने एक अभिनव प्रस्ताव मांडला -प्रॉडक्शन हाउस आणि रेकॉर्डिंग स्टुडीयोच्या स्थापनेचा! अनिलच्या घरी लक्ष्मी पाणी भरत होती, तेव्हा आर्थिक गुंतवणूक अनिलची आणि मेहनत, वेळ आणि डोकं शेखरचं या भागीदारी तत्वावर हा नवीन प्रकल्प उभारायचा अशी त्यांनी योजना आखली. या बदल्यात अनिल शेखरला पगारही देणार होता. थोडक्यात काय, कुणीही मोहात पडेल असं चित्र त्याने शेखरसमोर उभं केलं. या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला - शेखरने मुंबईला स्थायिक होण्याचा आपला इरादा बदलला.
शेखर जात्याच कष्टाळू आणि मेहनती आहे आणि त्यात जर विषय त्याच्या आवडीचा असेल आणि कोणाचीही ढवळाढवळ त्यात नसेल, तर मग त्याची समर्पण वृत्ती वाखाणण्यासारखी असते. अनिलचं हे प्रॉजेक्ट अगदी असंच होतं. खरंतर ही ऑफर शेखरच्या पथ्यावरच पडली होती कारण पुण्यातलं प्रस्थापित नाव सोडून मुंबईला शून्यातून सगळं उभं करणं नक्कीच सोपं नव्हतं आणि कितीही नाही म्हटलं तरी घर-दार सोडून लांब जाणं त्यालाही जडच जाणार होतं.
अथक परिश्रमानंतर वारज्याला 'पोप्यूलर नगर' मधे हा स्टूडीओ आकाराला आला. पैशाला कमी नव्हतीच त्यामुळे तडजोडीचा प्रश्नच नव्हता. ध्वनीमुद्रणासाठी लागणारी अद्यावत आणि अत्याधुनिक सामुग्री, लेटेस्ट सॉफ्टवेर्स, कनडेंन्सिंग आणि सिंगिग मायक्रोफोन्स, कमप्यूटर्स, ऍमप्लीफायर्स, प्रोसेसर्स, डीजीटल मिक्सर्स, रेकॉरडर्स, अत्याधुनिक हेडसेट्स हे सगळं तर होतच, पण त्याचबरोबर जागोजागी कलात्मक सजावट, रिसेप्शन रूम, गेस्ट रूम्स, किचन आणि दोघांसाठी आलिशान केबिन्स सुद्धा होत्या! त्याकाळी पुण्यातील एकमेव संपूर्ण वातानुकुलीत 'स्टेट ऑफ द आर्ट' 'या सम हाच' असा स्टुडीयो शेखर आणि अनिलने उभा केला होता. ३१ मे २००७ रोजी प्रसिद्ध गायिका अनुराधाताई पौडवाल यांच्या हस्ते या स्टुडियोचे उद्घाटन करण्यात आले. प्रेस कॉनफरन्स देखील बोलाविण्यात आली होती. 'न भूतो न भविष्यती' असा हा सगळा सोहळा झाला!
हे सगळं शेखरकडून ऐकतांना मला सारखं असं वाटत होतं कि स्टुडियोचं स्वप्न अनिलने बघितलं, शेखरने ते प्रत्यक्षात आणलं, अनिल पाठीशी उभा राहिला होता तर शेखर अहोरात्र झटला होता, अनिलने आर्थिक तरतूद केली होती तर शेखरची भावनिक गुंतवणूक जास्त होती, अनिलने काही कमी पडू दिलं नव्हतं तर शेखरने सगळं उभं केलं होतं, अनिल भक्कम आधारस्तंभ होता तर शेखर 'पाया' होता, स्टुडियो बघून अनिलची छाती अभिमानाने फुलून आली असेल; शेखरचे मात्र डोळे पाणावले असतील.…म्हणूनच असेल कदाचित या सुसज्ज, सर्वांगसुंदर स्टुडियोला नाव दिलं गेलं - 'निषाद ऑडियो-विज्यूअल्स!'
