← Musical Journey

आमुचा राम राम घ्यावा !!

by Dr. Manasi Arkadi

(25)

'कट्यार' मधे कविराज नावाचे एक पात्र आहे ज्याला संगीताचं सगळं ज्ञान आहे, पण गाता मात्र येत नाही. या कविराजला जेव्हा सदाशिव विचारतो की ''तुम्ही आता गायन विद्या शिकणार का'', त्यावर तो म्हणतो "गायन विद्या नाही, गायन कला आहे. कलेत आणि विद्येत फरक आहे. विद्या ही बाहेरून आत शिरते, तर कला आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरे असते, पण कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही लागते. विद्या ही तालासारखी आहे, शिकता येते, शिकवता येते, पण कला ही लयीसारखी आहे, ती मुळात असायला लागते आणि जन्माला येतांना वरूनच घेऊन यावी लागते." लाख पते की बात! शेखरकडेच बघा ना, तो गायन 'कला' घेऊन जन्माला आला आहे. गाण्याचं विधिवत शिक्षण घेतलेलं नसतांनाही त्याचं गायन परिपूर्ण आहे. याचं कारण, सुरांची समज तो 'genes' मधूनच घेऊन आला आहे, खेळणी दिसण्याआधी 'सतार' त्याच्या दृष्टीस पडली आहे, अंगाई अगोदर सरगम कानात भरली आहे आणि मुळाक्षरांच्या आधी स्वरांची ओळख झालेली आहे!

तसं पाहायला गेलं तर ताला-सुरात गाणारे काही कमी आहेत का, पण स्वर लावण्याची पद्धत, लगाव, ठेहराव, भाव ओतून गाण्याचे कसब, 'परकायाप्रवेश' करण्याची हातोटी असे निकष लावायला गेलो की गळतीला सुरवात होते आणि मग यातून जो उरतो तोच तरतो! या संपूर्ण प्रक्रियेतून तावून-सुलाखून निघत, थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल तीस वर्ष शेखर रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे. आज इतक्या वर्षानंतर देखील त्याचा पवित्रा बदललेला नाही. तोच उत्साह, तोच जोश, तेच हुनर, तीच उर्जा आणि तीच जय्यत तयारी. त्याचंही बरोबरच आहे म्हणा. समोर आव्हानच तसं जबरदस्त असतं, श्रोत्यांच्या निव्वळ श्रवणेंद्रियांपर्यंत पोहोचायचं नसतं, तर 'उनके दिल तक जाना है और ये लंबी दूरी तय करने में वक्त, लगन और कडी मेहनत तो लगती ही है!

तीस वर्षांच्या या प्रदीर्घ कालावधीत शेखरने प्रचंड गोतावळा जमा केला आहे. हा गोतावळाच त्याचा देव आहे, धर्म आहे. म्हणूनच, जमील शेख असो किंवा सुनील जोशी, प्रत्येकजण त्याच्यासाठी तेवढाच झटत असतो. फोटोग्राफर निखिल साळवे तर तापाने फणफणलेला असतांनाही 'फोटो शूट' साठी येतो. हे संबंध व्यावसायिक जरी असले, तरी व्यवहारापेक्षा नात्याला जपणारी आणि जागणारी ही माणसं 'निषाद'कडे असलेला अमुल्य ठेवा आहेत. शेखर जेव्हा म्हणतो की ही सगळी मंडळी नुसतीच 'सह'कलाकार नाहीत तर 'सहकार्य' करणारे कलाकार आहेत, तेव्हा त्यांच्यात असलेल्या घट्ट विणीची कल्पना येते. आज, अशी माणसं सोबतीला असतांना, इतका मान-मरातब मिळविलेला असतांना, एवढा अनुभव गाठीशी असतांना, कसं छान शिष्टासारखं मोजकच बोलून, सेलिब्रिटी टयांट्रम्स् दाखवून, आपण सगळ्यांपेक्षा खूsप वेगळे आहोत हे दुसऱ्याला जाणवून देत वागता आलं पाहिजे की नाही (आम्ही बघ, काही नसतांना पण कसे कायम तोरयात चालतो), पण 'निषाद'च्या कोणत्याच कलाकाराला ही एवढी साधी गोष्ट जमलेली नाही. सगळ्यांशी मोकळेपणाने बोलून, अभिनंदनाचे वर्षाव आदबीने स्वीकारून, अतिशय नम्रपणे वागून त्यांनी कलाकार आणि श्रोता यातली दरीच मिटवून टाकली आहे. मला वाटतं, 'निषाद'च्या शोज् ना 'रिपीट ऑडीयन्स' मिळण्याचं हेच खरं कारण असावं. सादरीकरण उत्तमच असतं, तिथे नावं ठेवायला जागाच नसते, पण त्यासोबत अनपेक्षितरीत्या मिळणारी ही आपुलकीची वागणूक सुखद धक्का देऊन जाते. तो माहोलच काहीतरी वेगळा असतो, एखाद्या फॅमिली गेटटुगेदर सारखा! पूर्वी, विकेंडला सगळी कामं झाल्यावर, जर वेळ असला तर, पेपर चाळून एखाद्या कार्यक्रमाला जाणारी मंडळी, 'निषाद'चा शो आहे म्हटल्यावर आपली 'महत्वाची' कामं बाजूला सारून शेखरच्या शो ला प्राधान्य द्यायला लागली आहेत… यश/लोकप्रियता याहून काय वेगळी असते? शेखरचं विचाराल तर, तो देखील मोकळेपणाने मान्य करतो की 'निषाद'च्या मेंबर्स समोर गातांना कणभर जास्तच समाधान मिळतं! हे ऋणानुबंध शब्दांच्या पलीकडले आहेत. आपल्या गणगोताचे कान एकदा का तृप्त केले की मग इतर कार्यक्रमात मोजकीच गाणी असली तरीही त्या 'खुलभर दुधाने' संपूर्ण गाभारा भरून जाण्याची किमया घडत असेल कदाचित!

मजल-दरमजल करत शेखर आज या टप्प्यावर येउन पोहोचला आहे. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. आतापर्यंत तुडविलेली वाट निश्चितच सोपी नव्हती. प्रचंड खाच-खळग्यांचा सामना करत, कधी वळणं घेत, कधी चढत, कधी उतरत, तर कधी ठेचकाळत तो अथक चालत राहिला आहे. एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगावीशी वाटते, एवढे टक्के-टोणपे खाउन देखील, शेखर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडित नाही. तो कुणाविषयीही वाईट बोलत नाही. सगळे सेटबॅक्स तो स्वतःच्याच खात्यात जमा करतो. म्हणतो, "कधी माझं नशीब रुसलं तर कधी माझेच काही निर्णय मला भोवले, कधी आराखडे चुकले तर कधी कुणावर मी ठेवलेला अतिविश्वास नडला." हे असं असून सुद्धा शेखर पाय घट्ट रोवून उभा आहे. कितीही जोरात वादळ आलं तरी झाडावर बसलेल्या पक्षाला फांदी मोडायची भीती नसते, कारण त्याचा विश्वास फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर असतो, अगदी तसाच शेखर देखील न डगमगता सगळ्या संकटांना पुरून उरला आहे कारण त्याचाही विश्वास त्याच्या गळ्यावर आहे, आवाजावर आहे. त्याचा निश्चय, त्याची जिद्द, त्याची इच्छाशक्ती, त्याचा आत्मविश्वास बघितला की वाटतं जणू तो जगाला ठामपणे सांगतोय, 'हम तो मुसाफिर है, कोई सफर हो हम तो गुजर जायेंगे ही, लेकिन लगाया है जो दाँव हमने वो जीतकर आएंगे ही!'

(समाप्त)