विठ्ठलाच्या पायी ...
by Dr. Manasi Arkadi
(4)
निषादची स्थापना ही शेखरने घेतलेली गरुडझेप होती. नवनिर्मितीचे हे वेड रक्तात इतकं भिनलं होतं कि त्यापुढे आपल्याकडे भक्कम आर्थिक पाठबळ नाही, आपलं वय खूप लहान आहे किंवा या व्यवहारी जगात निभाव लागण्याएवढा पक्केपणा, निर्भीड वृत्ती अजून आपल्यात नाही या गोष्टी त्याच्या लक्षातही आल्या नाहीत. जरी लक्षात आल्या असत्या, तरी संकटांना घाबरेल तो शेखर कसला! 'छिन्नी हातोड्याचे घाव' झेलत त्याचं स्वप्न मूर्त रूप घेतच होते.
शेखरची ध्येयासक्ती बघून नियतीने त्याच्या पदरात तिचं पहिलं दान टाकलं. एका अशा माणसाची भेट ज्याच्यावर खुद्द लावणीनेच मर्जी बहाल केली होती, ज्याची छबीदार छबी तोऱ्यात उभी होती, ज्याचा लाजरा नी साजरा मुखडा बघून सगळ्यांचा जीव भुलला आणि ज्याच्या लडिवाळ सुरांनी आपल्याला म्हाताऱ्याला चुगली न सांगण्याची विनवणी केली - लावणी सम्राट संगीतकार राम कदम.
राम कदम हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. एक असा अवलिया ज्याने आपल्या संगीताने उभ्या महाराष्ट्राला भुरळ घातली, लावणीचं लावण्य खुलवून तिला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं आणि आपल्या ग्यानबा-तुकाराम ठेक्याने, जो आता 'राम ठेका' म्हणून ओळखला जातो, सगळ्यांनाच ताल धरायला लावला.
शेखरच्या 'शाहीर पुणे' च्या एका शो ला राम कदम आले होते. कोरससाठी त्यांना काही मुले हवी होती आणि शेखरची त्यात निवड झाली. तब्बल तीन वर्ष शेखरला त्यांचा सहवास लाभला आणि या काळात जे सूर संस्कार त्याच्यावर झाले त्याची पुंजी आपल्या संपूर्ण आयुष्याला पुरून उरणारी आहे असं खुद्द शेखरचेच म्हणणे आहे. गाण्यातले चढउतार, हरकती, मुरक्या, लय, ताल, नेमक्या जागा याबाबतीत ते अतिशय आग्रही होते, पण हे सगळं सांभाळताना गाण्यातलं हळूवारपण, ग्रामीण भाषेचा लहेजा, भाव, ठसका याबाबतीत तडजोड केलेली त्यांना खपत नसे. शेखरच्या अभ्यासू वृत्तीमुळे तो हे सगळं शिकत गेला आणि म्हणूनच असेल कदाचित शेखरच्या गायकीमधे आपल्याला राम कदमांचा प्रभाव खूप जाणवतो. मनापासून केलेल्या या श्रवणभक्तीने 'देवाजीची दारं' शेखरसाठी कायमची खुली झाली.
ज्या पिक्चरच्या कोरससाठी शेखरची निवड झाली होती तो पिक्चर होता 'जन्मठेप.' कथा 'पानिपत' कार विश्वास पाटील यांची, पार्श्वगायिका आशा भोसले, गीतकार कवी संजीव, संगीतकार राम कदम, मुहूर्त केला होता नौशाद यांनी आणि हे रेकॉर्डिंग 'फेमस स्टुडीओ' मधे झाले जिथे शंकर जयकिशन यांनी आपली सगळी रेकॉर्डिंग्स केली होती. वादक आणि गायक यांचे एकत्रित रित्या झालेले कदाचित हे शेवटचेच रेकॉर्डिंग असावे. लाईव्ह रेकॉर्डिंगचा हा अनुभव शेखरला खूप काही शिकवून गेला.
रेकॉर्डिंग संपले परंतु हे नाते मात्र टिकून राहिले. आपल्या लाईव्ह शोज् मधे राम कदम यांनी शेखरला गायक म्हणून कायम पसंती दिली आणि त्या दोघांमधला जिव्हाळा वाढतच गेला. शेखर त्यांच्या 'घरचा' कधी झाला हे शेखरलाच काय राम कदम यांना देखील कळले नसावे.
'संपले जीवन संपली ही गाथा'… १९ फेब्रुवारी १९९७ ला राम कदम यांनी आपला कायमचा निरोप घेतला. लावणीचा सुर्य अस्ताला गेला, पण या सूर्याची परावर्तीत किरणं ज्या चंद्रावर पडली त्या शेखरने आपल्या प्रत्येक मराठी गाण्याच्या शो ला त्यांची गाणी गाऊन त्यांना आदरांजली वाहिली. अजूनही दर गुरुपौर्णिमेला शेखर त्यांच्या घरी जातो. आज त्यांच्या मृत्यूला २३ वर्ष पूर्ण होऊन देखील त्यात अजिबात खंड पडलेला नाही…. कितीही अडचणी आल्या तरी. ही त्याची गुरुभक्ती पाहून शेखरच्या 'विठ्ठलाच्या' पायाची वीट नक्की थरारली असेल!
