← Musical Journey

शुभारंभ नवनिर्मितीचा !

by Dr. Manasi Arkadi

(5)

वपु म्हणतात आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमधे किती मुंग्या असतील याचा अदमास बाहेरून घेता येत नाही, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे.…निषादच्या ३० वर्षांच्या प्रवासात शेखरकडे सुद्धा असच एक आठवणींच्या मुंग्यांचं वारूळ तयार झालं आहे आणि या लेखमालेच्या निमित्ताने त्या मुंग्यांनी बाहेरचा रस्ताही आता धरला आहे. या वारुळाकडे एक त्रयस्थ म्हणून बघतांना ते कितीही सप्तरंगी, कलात्मक, आकर्षक वगैरे वगैरे वाटलं ना, तरीही या वारुळाला आकार देताना, त्यासाठी लागणारे वाळूचे कण जमवतांना, त्याला उन-पावसा पासून वाचवताना शेखरची खूप दमछाक झाली आहे. जमा केलेल्या प्रत्येक साखरेच्या दाण्यामागे प्रचंड मेहनत आहे आणि अर्थातच स्वनिर्मितीचं विलक्षण समाधान सुद्धा!

'निषाद' या बॅनर खाली शेखरने जो पहिला शो केला तो होता 'स्वराली.' हा रूढ अर्थाने पहिला व्यावसायिक शो म्हणता येणार नाही कारण लोणावळा येथील किनारा हॉटेल मधे तुषार छेडा यांनी तो आयोजित केला होता. या ऑर्केस्ट्राला 'स्वराली' हे नाव द्यावे ही त्यांचीच कल्पना! तुषारजी यांचा स्वतःचा संगम ऑर्केस्ट्रा असतांना देखील त्यांनी शेखरला संधी दिली याबद्दल शेखर आजही त्यांचा ऋणी आहे.

पहिल्या व्यावसायिक शो चा मान आपण टिळक स्मारक मंदिरात झालेल्या 'स्वराली' ला देऊयात. तारीख होती २० मे १९९१. पाठीशी फारसा अनुभव नाही आणि गाठीशी फारसा पैसा नाही अशी अवस्था असतांना देखील दुर्दम्य इच्छाशक्ती आणि नवनिर्मितीचा ध्यास या बळावर शेखरने हा शो केला. साथीला त्याच्या सारखेच 'झपाटलेले' कलाकार; गायिका वैशाली सेवेकरी, प्रतिभा इनामदार, संगीता भिडे आणि ज्योती ओक, गायक स्वतः शेखर, निवेदक दयानंद घोटकर, सिंथेसायझर - जितेंद्र कुलकर्णी, बासरी - अमर ओक, गिटार - राजू निरगुडे, व्हायोलिन - वैशाली सप्रे आणि अंजली सिंगडे, तबला - गिरीश महामुनी, ढोलक/ढोलकी - केदार मोरे, ताल वाद्यांवर होते उमेश चावक, धनंजय अमोणकर आणि विश्वनाथ गायकवाड आणि ध्वनी संयोजन पप्पू शहा यांचं.

निषादचं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या दोन गोष्टी या शो मधे घडल्या; त्यातली पहिली गोष्ट होती गाण्यांची निवड. मराठी वाद्यवृंद म्हंटल्यावर त्यात सादर होणाऱ्या गाण्यांचा एक ठराविक साचा एव्हाना बनून गेला होता, त्यामुळे इतर कोणत्याही कार्यक्रमात सादर न होणारी, दर्जेदार परंतु फारशी रसिकांसमोर न आलेली, वेगळ्या धाटणीची गाणी 'स्वराली' च्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करण्याचे सर्वानुमते निश्चित केले गेले. जुन्या मराठी/हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला जेव्हा रसिक तिकीट काढून येतो तेव्हा निश्चितच त्याचा 'क्लास' खूप वेगळा असतो. शेखर हे जाणून होता आणि म्हणूनच त्याने फक्त 'तन डोले' अशी गाणी न निवडता 'मनही डोले' अशी गाणी निवडली. लेक लाडकी या घरची, ऐन दुपारी यमुनातीरी, चोरीचा मामला, अश्विनी ये ना, निशाणा तुला दिसला ना, तू गेल्यावर असे हरवले सूर, मनी जे दाटले, ससा तो ससा, येऊ कशी प्रिया, तळव्यावर मेंदीचा, निसर्गराजा ऐक सांगते, बंदिनी स्त्री ही बंदिनी, रात्रीस खेळ चाले.. अशी ऑर्केस्ट्रामधे सहसा ऐकू न येणारी गाणी शेखरने सादर केली आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात रसिकांची मने जिंकली.

उच्च निर्मितीमूल्य हे निषादचे आणखी एक वैशिष्ठ्य ठरले. शेखरने इलेक्ट्रिक गिटार, सिंथेसायझर, व्हायोलीन, बासरी, सॅक्सोफोन, अकॉर्डियन, ढोल, डफ, चंडा, मादल, डूग्गी, कोंगो-बोंगो, ड्रम्स अशा मराठी ऑर्केस्ट्रात एरवी ऐकू न येणाऱ्या वाद्यांचा वापर करून रसिकांना पुरेपूर श्रवणसुख दिले. ही निषादची सूर-तालाची श्रीमंती श्रोत्यांना खूप भावली, पण…. जेवढे आले होते तेवढ्यांनाच, कारण सुरांच्या या दुनियेत शेखरचे नाव अजून प्रस्थापित झाले नव्हते. परिणाम व्हायचा तोच झाला. या शो ला व्यावसायिक यश मिळाले नाही, पण शेखर खचून गेला नाही, तो पुढच्या शो च्या तयारीला लागला.

आर्थिक फटका बसूनही ही 'स्वराली' शेखरसाठी कायमच हृद्य आठवणींची राहील. साहजिकच आहे, कारण ते निषादचं पाहिलं अपत्य होतं!