"रजनीगंधा " जीवनी या ...
by Dr. Manasi Arkadi
(7)
संगीत है शक्ती ईश्वर की, हर सूर मे बसे है राम
रागी जो सुनाये राग मधुर, रोगी को मिले आराम I
खरच, संगीतकला ही ईश्वरी देणगी आहे. गायक, वादक, गीतकार, संगीतकार आयुष्यभर या कलेची उपासना करीत असतात. संगीताशी निगडीत कुठल्याही क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे हे कोणा येऱ्यागबाळ्याचे काम नाही. त्याला प्रचंड अभ्यास लागतो, बैठक लागते. संगीतावर नुसते प्रेम असून चालत नाही, तर निष्ठा असावी लागते. हे असे झोकून देणे ज्यांना जमते त्यांच्याकडूनच अभूतपूर्व अशी कलाकृती निर्माण होते. पूर्वीच्या संगीतकारांसाठी देखील संगीत हा केवळ छंद नव्हता, तर ध्यास होता, वेड होतं आणि म्हणूनच त्यांच्याकडून चिरंतन टिकणारे, मनाच्या तारा छेडणारे, अवीट गोडीचे संगीत दिले गेले. आज इतक्या वर्षांनंतर देखील ते संगीत आणि ते संगीतकार आपल्या मनावर राज्य करीत आहेत.
हिंदी/मराठी चित्रपटसृष्टीतील अशा अनेक संगीतकार जोडींवर आपण मनापासून प्रेम केले; अगदी हुस्नलाल-भगतराम, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल पासून आजच्या अजय-अतुल पर्यंत. अशीच एक श्रवणीय जोडी होती अनिल-अरुण!
अनिल मोहिले यांना संगीत वारसाहक्कानेच मिळाले होते. आजोबा हार्मोनियम वादक तर वडील बुलबुलतरंग व बासरीवादक. स्वतः अनिल संगीत विशारद होते. ते उत्तम व्हायोलीन देखील वाजवीत. आकाशवाणीच्या नोकरीमुळे त्यांना अनेक संगीतकारांची काम करण्याची पद्धत जवळून बघता आली. नामवंत संगीतकारांकडे वाद्यवृंद संचालनाची संधीही त्यांना मिळाली. अरुण पौडवाल यांना देखील शास्त्रीय संगीताची बैठक होती. ते स्वतः एक उत्तम अकॉर्डियन वादक होते. कल्याणजी-आनंदजी, एस. डी. बर्मन यांच्या सारख्या अनेक दिग्गज संगीतकारांकडे ते वादक म्हणून काम करीत होते. 'मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू' या गाण्यातील अकॉर्डियनचा पीस अरुण पौडवाल यांनीच वाजविलेला आहे. १९७० साली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, अरुण आणि अनिल यांच्या मिळत्याजुळत्या संगीत कल्पना बघून, संयुक्तिक नावाने काम करण्याचा सल्ला त्यांना दिला आणि मराठी मधील पहिली संगीतकार जोडी जन्माला आली. अकॉर्डियन, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, इलेक्ट्रिक गिटार, बेस गिटार, ड्रम्स, मादल, बोंगो-कोंगो अशा पाश्चिमात्य वाद्यांचा वापर करून त्यांनी मराठी भावगीतांचा चेहरा-मोहराच बदलून टाकला.
इतक्या कर्तृत्ववान जोडीची दखल रंगमंचीय कार्यक्रमातून तोवर कोणीही घेतली नव्हती. सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या शेखरला यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम करावा असा मोह झाला नसता तरच नवल! त्याने सर्वप्रथम दैनिक सकाळमधे त्यांच्यावर एक लेख लिहिला आणि त्यानंतर कार्यक्रमाचे स्वरूप आखले. दुर्दैवाने अरुणजी तो पर्यंत या जगात नव्हते. त्यामुळे अनिल मोहिले यांना निमंत्रित करून, त्यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या रचनांचा मागोवा घ्यावा असे त्याने ठरविले. पुन्हा एकदा विवेक परांजपे मदतीला धावून आले आणि त्यांनी अनिलजींचा नंबर शेखरला दिला. शेखरने अनिलजींशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या निगर्वी आणि साध्या स्वभावाने तो भारावून गेला. त्यांना भेटायला शेखर मुंबईला गेला. शेखरने लिहिलेला लेख वाचून अनिलजी प्रभावित झाले आणि त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले. अशारितीने २० जून १९९५ ला बालगंधर्व रंगमंदिरात 'रजनीगंधा' चा पहिला प्रयोग झाला. सर्व प्रश्नांची मनमोकळी उत्तरे देऊन अनिलजींनी रसिकांची मने जिंकली. अनिल - अरुणच्या संगीत रचनांमध्ये जास्त रचना या अरुणने केलेल्या आहेत हे सांगायला ते जराही कचरले नाहीत. अरुणजींचे मोठेपण त्यांनी दिलखुलासपणे मान्य केले.
स्वप्नातल्या कळ्यांनो, रसिका मी कैसे गाऊ गीत, हरीनाम मुखी रंगते, रजनीगंधा जीवनी या, परीकथेतील राजकुमारा, ससा तो ससा, रुपेरी वाळूत, येऊ कशी प्रिया, धुंदीत गंधित होवुनी सजणा, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, बंदिनी, या रावजी बसा भावजी, तू गेल्यावर असे हरविले सूर, निशाणा तुला दिसला ना, आला जयराम आला, नको रे नंदलाला, मी जलवंती, तळव्यावर मेंदीचा, अश्वीनी ये ना, चोरीचा मामला, राजा ललकारी, काळ्या मातीत मातीत, हृदयी वसंत फुलताना, अष्टविनायका तुझा महिमा कसा.. अशी रंगमंचावर सहसा सादर न होणारी गाणी या निमित्ताने शेखरने सादर केली. ‘अष्टविनायका’ हे गाणे तर मुळ चित्रपटबरहुकुम नृत्यासह रंगमंचावर सादर केले गेले. कार्यक्रम खूप रंगला..शेखरने निवडलेल्या गाण्यांतील वैविध्य बघून अनिलजींनाही हा शो खूप आवडला आणि त्यांनी तशी जाहीर दाद ही दिली. या कार्यक्रमासाठी अनिलजींनी शेखरकडून मानधन तर घेतले नाहीच पण साधा प्रवास खर्च देखील मागितला नाही.
'या रावजी बसा भावजी' ही लावणी आज सुरेखा पुणेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपरयात जरी पोहोचविली असली तरी तिला पहिली रंगमंचीय ओळख 'निषाद' ने दिली हे विसरून चालणार नाही.
याच कार्यक्रमामुळे पुढे सुप्रसिद्ध गायिका अनुराधाजी पौडवाल शेखरच्या सांगीतिक आयुष्यात आल्या, पण हा किस्सा पुढे कधीतरी .…!
