रंग लोक कलेचा !
by Dr. Manasi Arkadi
(8)
'राकट देशा, कणखर देशा, दगड्यांच्या देशा' असे वर्णन जरी कवी वसंत बापट यांनी महाराष्ट्राचे केले असले तरी याच महाराष्ट्राला एक हळवी किनार पण आहे आणि ती म्हणजे इथलं लोकसंगीत. इथल्या पापभिरू, भोळसट माणसाच्या भावनांशी निगडीत असलेले हे संगीत थेट आपल्या मनाला जाऊन भिडते. ओव्या, वासुदेव, गण-गवळण, कटाव-बतावणी, लावणी, पोवाडा, वाघ्या-मुरळी, धनगरगीते, कोळीगीते, बाल्यागीत, जागर, गोंधळ, कडकलक्ष्मी, दिंडी, अभंग, भारुड, बहुरूपी, डोंबारी, ठाकरगीत… असे असंख्य गीत प्रकार; प्रत्येकाचा बाज वेगळा, ठेका वेगळा, मूड वेगळा, पण गोडी मात्र तीच. महाराष्ट्राच्या काळ्या मातीशी एकरूप झालेल्या या गीतांची जादू काही औरच आहे. जुन्या परंपरा मोडीत काढून आपण कितीही स्वतःला नव्या युगाचे म्हणवून घेत असलो ना तरीही या सांस्कृतिक वारस्याचा पगडा आपल्या मनावर इतका जबरदस्त आहे की हा पाश सोडवतही नाही आणि ही परंपरा मोडवतही नाही.
शेखरच्या बाबतीत बोलायचे तर त्याची नाळच लोकसंगीताशी जोडली गेली होती. आपल्या गान-कारकिर्दीची सुरवात ज्याने 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाने केली त्याच्याभोवती या लोकगीतांचा विळखा किती घट्ट पडला असेल याची कल्पना करून बघा! 'पहिलं प्रेम' जसं विसरता विसरत नाही तसेच काहीसे या गीतांबाबत शेखरचे झाले होते. याची बीजं त्याच्या मनात इतकी खोल रुजली गेली होती की त्याला खत-पाणी घालून अंकुरित करावं ही सुप्त इच्छा सारखी डोकं वर काढीत होती. 'निषाद' ची स्थापना केल्यावर तर या इच्छेचे रुपांतर ध्यासात झाले आणि ही सगळी गाणी त्यांच्या मूळ वैशिष्ठ्यांसह, नैपथ्यासह, वेशभूषेसह आणि नृत्यासह सादर करावी ही ओढ त्याला स्वस्थ बसू देईना.
मनात विचार यायचा अवकाश, शेखर झपाटल्यासारखा या कार्यक्रमाच्या तयारीला लागला. या आपल्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवितांना त्याला खूप परिश्रम घ्यावे लागले. कार्यक्रमाची रूप-रेषा आखणे, गाणी निवडणे, लोकसंगीतातले बारकावे समजून घेणे, बारीक-सारीक तपशीलांसकट त्याचा लेखा-जोखा मांडणे, नैपथ्याच्या माध्यमातून तो माहोल तयार करणे, लोकसंगीतात वाद्ये जरी कमी लागत असली तरी ती पारंपारिक वाद्ये मिळविणे आणि ते वाजविणारे कलाकार शोधणे असे एक ना अनेक आव्हानांना तोंड देत शेखरने आपले स्वप्न साकार केले.
हा समृद्ध वारसा जपणारे लोक-कलावंत शाहिर साबळे, देवदत्त साबळे, कृष्णदेव मुळगुंद सर, संगीतकार राम कदम यांचा आदर्श शेखरच्या डोळ्यापुढे होताच. त्यांना मनोमन वंदन करून 'रंग लोककलेचा’ हा भव्य कार्यक्रम शेखरने रंगमंचावर आणला. बाबू गेनू चौकात ५ मे १९९५ रोजी याचा पहिला स्वतंत्र प्रयोग सादर झाला. तत्पूर्वी आपल्या 'स्वराली' या शो च्या माध्यमातून शेखरने या गीतांची झलक दाखवून श्रोत्यांची उत्सुकता वाढविली होतीच. त्यामुळे त्याच्या या अभिनव संकल्पनेला पदार्पणातच चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक महोत्सवांमध्ये हा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्याला आग्रह होऊ लागला. राज्यस्तरीय स्टुडंट कॉनफ़रन्स, पुणे फेस्टिवल, इतकच काय 'सातारा फेस्टिवल' ची सुरवात देखील याच शो ने झाली. या प्रतिसादामुळे शेखरचा उत्साह इतका दुणावला की परदेशी पाहुण्यांसमोर इंग्रजीत निवेदन करून त्याने आपल्या परंपरेची त्यांना ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्याने केले.
सरते शेवटी या सगळ्या कार्यक्रमांचा हिशोब मांडतांना, पैशाचे पारडे क्वचित प्रसंगी हलकेच राहिले, पण मानसिक समाधानाचे पारडे मात्र प्रत्येक शो नंतर जड होत गेले. शेखर सारख्या मनस्वी आणि हळव्या कलावंताला अजून काय पाहिजे असते!
