दिल की आवाज सुनो..
by Dr. Manasi Arkadi
(9)
जीवन के दोराहे पे खडे सोचते है हम जाए तो किधर जाए
ताने है दिल इधर को तो खींचे उधर कदम I
आयुष्याची गाडी सरळ एकमार्गी चालू आहे असे वाटत असतांना, कधीतरी अचानक एखाद्या वळणानंतर रस्त्याला दोन फाटे फुटतात, सुरळीत चाललेल्या प्रवासाची गती मंदावते आणि मनात द्वंद्व सुरु होते - यातला नक्की कुठला रस्ता आपल्याला इच्छित स्थळी घेऊन जाईल? गीतकार शैलेंद्र यांनी शब्दबद्ध केलेली ही द्विधा मनस्थिती आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी अनुभवली आहे, अगदी 'तंग आ चुके है कश्मकश-ए-जिंदगी से हम' म्हणण्याइतके आपण हताश सुद्धा झालेलो आहोत, पण हे सगळे वयाच्या तेवीस-चोविसाव्या वर्षी?…. नक्कीच नाही. शेखरच्या बाबतीत मात्र याच कोवळ्या वयात त्याच्यातल्या परिपक्वतेचा कस लागावा अशी परिस्थिती निर्माण झाली.
चारचौघांसारखेच त्यानेही graduation पूर्ण केल्यावर नोकरीचा धोपट मार्ग स्वीकारला खरा, पण गाण्याचे वेड काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. गाणे आणि नोकरी या दोन्ही आघाड्या सांभाळतांना त्याला तारेवरची कसरत करावी लागत होती. एकीकडे गाण्याच्या शो संदर्भात नवनवीन कल्पना सुचत होत्या, सतत काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू होते आणि त्याच्या या धडपडीला रसिकांची भरभरून दादही मिळत होती, पण हे सगळे हवेहवेसे वाटत असतांनाच या क्षेत्रातल्या अनिश्चिततेची झळ देखील बसत होती. पैशांची जमवाजमव करतांना होणारी दमछाक, जमा-खर्चाचा न जुळणारा ताळमेळ, खर्च केलेली पै न पै परत मिळेलच याची नसलेली शाश्वती या गोष्टी त्याला अस्वस्थ करणाऱ्या होत्या आणि त्याच वेळेस दुसरीकडे होती महिन्याकाठी ठराविक रक्कम घरात आणणारी आणि एकूणच जीवनाला आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी!
सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचे सोंग मात्र आणता येत नाही, मग अशा परिस्थितीत नोकरी सांभाळून आपल्या कलेला छंद या स्वरूपात मर्यादित ठेवावे की नोकरी सोडून, कलाक्षेत्रातील चढ-उतार गृहीत धरून, पूर्ण वेळ गायनाला झोकून द्यावे हा यक्षप्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. त्याचे मन एकीकडे ओढ घेत होते तर बुद्धी दुसरच काहीतरी त्याला पटवू पहात होती. कोणाचे ऐकावे? कशाला झुकते माप द्यावे? 'काय करावे काही सुचेना' या संभ्रमावस्थेतून शेखर जात होता. क्षण कसोटीचा होता आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक होते.
नोकरी सांभाळून कला जोपासणे हा पर्याय व्यावहारिकदृष्ट्या कितीही योग्य असला, तरी असे 'विभागलेले आयुष्य' जगण्यासाठी शेखर मधला कलावंत राजी होत नव्हता. ‘एकच काहीतरी करेन पण त्याला शंभर टक्के न्याय देईन आणि जो निर्णय घेईन तो तडीस नेईन, यु टर्न घेऊन माघारी फिरणार नाही’ असा त्याचा बाणा!
अशा साशंक मनस्थितीतून जात असतांना देखील कोणाकडूनही कुठल्याही प्रकारच्या मदतीची त्याची अपेक्षा नव्हती, एक आस मात्र जरूर होती - कोणीतरी पाठीवर हात ठेऊन 'लढ' म्हणावे… 'मै हुं ना' असा दिलासा द्यावा! शेखरच्या मनातली ही घालमेल त्याच्या वडिलांनी अचूक ओळखली आणि त्यांनी शेखरला मनाचा कौल घेण्याचा सल्ला दिला. 'दिल-ओ-दिमाग की कश्मकश में ए दोस्त दिल की आवाज सुनने से न डर, माना ये सफर मुश्किल है मगर दिल जाने है तुझे दिमाग से बेहतर' हेच जणू त्यांनी शेखरला सांगितले. वडिलांच्या या आश्वासक शब्दांनी संभ्रमाचे सगळे काळे ढग दूर झाले, स्वच्छ सूर्यप्रकाशाने आसमंत उजळून निघाला आणि शेखरने नोकरीचा राजीनामा दिला!
