← Musical Journey

सूर तेच छेडिता !

by Dr. Manasi Arkadi

(10)

'एक प्रस्थापित गायक'

डोंबारयाचा खेळ आठवतोय? डोंबारयाची चिमुरडी पोर उंच बांधलेल्या दोरीवर विलक्षण सहजतेने करामती करीत असते. बघणारे आपण कमालीचे धास्तावलेले असतो, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवलेशही नसतो, असते फक्त एक निरागस हसू…. कारण खाली तिचे वडील ढोल वाजवीत तिच्या बरोबरीने चालत असतात. आपण पडलो तर वडील आपल्याला वरचेवर झेलून घेतील हा प्रचंड विश्वास तिच्याकडे असतो आणि म्हणूनच ती जीवाची पर्वा न करता तो खेळ दाखविण्यात रममाण झालेली असते.…वडिलांच्या पाठींब्याने शेखर देखील असाच निर्धास्त झाला. मी हरलो, कमी पडलो तर मला सावरून घेणारे हात आहेत या भावनेने तो सुखावला आणि तो देखील हा सुरांचा खेळ दाखविण्यात रमून गेला. 'सप्तस्वरांनो लय शब्दांनो जगेन तुमच्यासाठी' हे सुधीर मोघे यांचे शब्द सार्थ करीत या सात स्वरांच्या दुनियेत तो हरवून गेला. शो जर 'निषाद' चा असेल तर प्रत्येक शो 'हट के' कसा होईल या करिता तो धडपडत राहिला आणि जर 'निषाद' चा नसेल तर वाट्याला आलेल्या प्रत्येक गाण्यात voice modulation skill चा वापर करून 'शेखर टच' कसा देता येईल यासाठी तो प्रयत्न करीत राहिला. म्हणूनच अल्पावधीत वाद्यवृन्दाच्या जगात स्वतःचे वेगळे अस्तित्व, एक वेगळी ओळख निर्माण करण्यात तो यशस्वी झाला.

वाद्यवृंदात गाणे हे खरच खूप आव्हानात्मक आहे. गीतकाराला त्या गाण्यातून काय सांगायचे आहे, संगीतकाराला ते आपल्यापर्यंत कसे पोचवायचे आहे, गायकाला ते कसे मांडायचे आहे आणि नायकाला ते पडद्यावर कसे दाखवायचे आहे हे सगळे केवळ ३.५ मिनिटात, कसलीही कंटीन्युटी नसतांना, समर्थपणे सादर करणे खरोखरच अवघड काम आहे. हा एवढा द्राविडी प्राणायाम एका गाण्या पुरता मर्यादित नसतो तर अशी एका पाठोपाठ २३-२४ गाणी तेवढ्याच ताकदीने पेश करायची असतात. शेखर ही किमया सहज करून दाखवितो. त्याची मोमेंटरी ईनटेंसिटी इतकी जबरदस्त आहे की तो सहज एका मूड मधून दुसऱ्या मूडमध्ये जातो.

शेखरला एका बाबतीत नशीबवानच म्हटले पाहिजे कारण एक गायक म्हणून स्वतःच्या गळ्याला आकार देतांनाच्या काळात त्याला अनेक दिग्गजांचे सुराशिर्वाद लाभले; संगीतकार राम कदम, सुधीर फडके, अनिल मोहिले, अरुण पौडवाल, सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर आणि या सगळ्यांचा प्रभाव त्याच्या गायकीत दिसून येतो. खरंतर, प्रत्येक गायकाचा बाज वेगळा, ढंग वेगळा, लकबी वेगळ्या, गातांना श्वास घेण्याच्या जागा देखील वेगळ्या, पण शेखर हे सगळं तसं च्या तसं उचलतो आणि आपल्याला त्या ओरिजिनल गाण्याचा फील देतो. म्हणूनच 'सूर तेच छेडीता' गातांना 'सौख्य' या शब्दाचा उच्चार महेंद्र कपूरची आठवण करून देतो तर 'ना तुम हमें जानो' मधला 'खामोशी' हा शब्द थेट हेमंतदांची! 'धुंदी कळ्यांना' या गीतातील 'शब्द' मधला 'श' ऐका. हा 'श' ना शहामृगातला आहे ना षट्कोनातला, तो बाबुजीं स्पेशल 'श' आहे आणि शेखर तो अगदी तसाच उच्चारतो!

शेखरच्या आवाजाची रेंज खूप मोठी आहे आणि त्यामुळेच तो सर्व प्रकारची गाणी अगदी सहजतेने गाऊ शकतो. त्याने म्हटलेली हलकी फुलकी गाणी आपल्याला बसल्या जागी ठेका धरायला लावतात तर विरहाची किंवा दुःखाची गाणी पापण्या भिजवितात. सहज चक्कर मारावी तसा त्याचा आवाज तिन्ही सप्तकात फिरून येतो. एकाच गाण्यात तो खर्जातून तार सप्तकात झेपावतो आणि अलगद खर्जात परत येतो…. स्वरांची जागा अजिबात हलू न देता. त्याचे 'मेरे नैना सावन भादो' ऐकून बघा, मी काय म्हणते ते पटेल! गायकाच्या दमसांसाची परीक्षा घेणारी ही गाणी आहेत. ही अशी गाणी एकदा गायची म्हटली तरी गातांना त्रास होतो, पण शेखर once more सुद्धा घेतो आणि लगेच पुढचे गाणे तेवढेच समरसून गातो!

'पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे मिला दो लगे उस जैसा' शेखरचा आवाज या जातीचा आहे. किशोरदांचे yodeling असो, रफी साहेबांच्या आवाजातला गोडवा असो, तलतजींचे vibrato असो, हेमंतदांच्या आवाजातील मखमली हळूवारपण असो, मन्नादांच्या गळ्यातून नव्हे हृदयातून निघणारे स्वर असो किंवा मुकेशजींचा अनुनासिक पण 'दिल को छु जानेवाला' आवाज असो, कुठलाच आवाज त्याला वर्ज नाही आणि म्हणूनच इतकेच म्हणावेसे वाटते 'हर रंग में उसका जलवा रंग जमाए!'